" जाने कैसे सपनोंमे खो गयी अखियां, मै तो हू जागी मेरी सो गयी अखियां"
डॉक्टरांना मात्र अशी विचित्र तक्रार पेशंट कडून कधीकधी ऐकावी लागते. वरकरणी क्षुल्लक वाटणाय्रा अशा या तक्रारीमागे दडलेला असू शकतो एखादा जीवघेणा आजार !
काही दिवसांपूर्वी अशीच तक्रार घेवून श्री अनंतराव गायकवाड माझ्या क्लिनिकमध्ये आले होते. सुमारे पंचेचाळीस वर्षांचे अनंतराव शिवाजी स्कूलमध्ये लेखनिकाची नोकरी करीत असत. जरी त्यांची आई माझीच पेशंट असली तरी स्वतःला मात्र कोठलीही शारीरिक व्याधी नसल्यामुळे पेशंट या नात्याने ते माझ्याकडे प्रथमच आले होते.
"सर, आजकाल दिवसभर काम करून संध्याकाळी जेव्हा मी घरी येतो तेव्हा मी खूपच दमून जातो. सायंकाळी जेवताना पहिली चपाती मी व्यवस्थित खावू शकतो. पण त्यानंतर दुसरी चपाती खाताना मात्र माझा घास तोंडातच फिरतो. मला घास चावताच येत नाही. माझे जबड्याचे स्नायू इतके दमतात की मला तोंडाची उघडझाप मुळीच करता येत नाही. थोडा वेळ विश्रांतीनंतर मात्र मी पुन्हा चावू शकतो पण काही घासानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या! पुन्हा माझे स्नायू माझ्याशी असहकार पुकारतात. काही वेळी मी घास गीळूदेखील शकत नाही. काही वेळी माझ्या सौं.ना माझा आवाजही काहींसा खोल गेल्यासारखा वाटतो."
"हे असे किती दिवसांपासून होते आहे?" मी.
"हा प्रकार गेले चारपाच आठवड्यांपासून चालला आहे. सुरवातीस मी अशक्तपणामुळे असे होत असेल असे समजून त्याकडे फारसे लक्ष्य दिले नव्हते पण हळूहळू त्याचे प्रमाण वाढतच चालले आहे असे वाटल्यामुळे आपला सल्ला घेण्यासाठी आलो आहे."
अनंतराव त्यांच्या या तक्रारी सांगत असताना मी मात्र त्यांच्या चेहेऱ्याच्या हालचालींचे बारकाईने निरीक्षण करीत होतो.
"अनंतराव, तुमच्या पापण्या एखाद्या झोपाळू माणसाप्रमाणे अर्धवट मिटल्यासारख्या दिसत आहेत, हे तुमच्या अथवा घरातील दुसऱ्या कोणाच्या लक्ष्यात आले आहे का?"
"नाही, मला तसे कधी जाणवले नाही"
इतका वेळ शांत बसलेल्या सौ. अनंतरावांनी प्रथमच आमच्या संभाषणामध्ये भाग घेतला.
"डॉक्टर, तुम्ही म्हणता तसा बदल मला आजकाल लक्षात येवू लागला आहे. यांच्या पापण्या कधीकधी एखाद्या पेंगणाऱ्या माणसाप्रमाणे अर्धवट मिटलेल्या असतात तर कधीकधी त्या एकदमच नॉर्मल असतात. अर्थात हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते याची मला काहीच माहिती नव्हती. संध्याकाळी बोलत असताना त्यांचा आवाज हळूहळू लहान होत जातो व थोड्या वेळाने तो तो पुन्हा पूर्ववत होतो, हेही माझ्या लक्षात आले आहे. कदाचित या तक्रारींचा या खाण्याच्या ताक्ररीशी काही संबंध असू शकेल काय? "
" अगदी बरोबर, ताईसाहेब, तुमच्या निरीक्षणशक्तीचे खरोखरच कौतुक करावयास हवे." अनंतरावांना तपासतानाच मी त्यांच्या सौंशी बोलत होतो.
"अनंतराव, तुमचे स्नायू इतर सामान्य माणसापेक्षा लवकर थकतात असे मला वाटते. आपण एक छोटीशी टेस्ट करून पाहू या. आपले डोळे बंद करणाऱ्या स्नायूंच्या कार्यक्षमतेविषयी आपण तपासणी करणार आहोत. आता मी सांगितल्यानंतर तुम्ही दोन्ही डोळे अगदी घट्ट मिटून घ्या. मी तुमचे डोळे माझ्या हातांनी उघडण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही तुमचे डोळे घट्ट मिटून ठेवा व मला तुमचे डोळे उघडू देवू नका."
अनंतरावांनी मी सांगितल्या बरहुकूम डोळे घट्ट बंद करून ठेवले व मी खूप जोर लावूनही ते उघडू शकलो नाही.
"शाब्बास, तुमच्या डोळ्यांच्या स्नायूंची शक्ती अगदी नॉर्मल आहे. आता तुम्ही एक मिनिटभर तुमचे दोन्ही डोळे पुन्हा घट्ट बंद करून ठेवणार आहात. एक मिनिटभर डोळे बंद करण्याचे काम केल्यानंतर मी पुन्हा एकदा तुमच्या डोळ्यांच्या स्नायूची शक्ती तपासून पाहणार आहे."
माझ्या सूचना व्यवस्थितपणे समजून घेवून अनंतरावांनी बरोबर एक मिनिट डोळे घट्ट मिटून ठेवले. त्यानंतर लगेचच मी पुन्हा त्यांचे डोळे उधद्ण्याचा प्रयत्न केला. आणि काय आश्चर्य! त्यांच्या डोळ्याचे स्नायू इतके दुर्बल झाले होते कि मी ते अगदी सहजपणे उघडू शकत होतो.
अनंतरावांना स्नायू अशक्त होण्याचा एक विशिष्ट आजार असण्याचे प्राथमिक अनुमान मी आत्तापर्यंत काढले होते. या आजाराची हि प्राथमिक अवस्था असल्यामुळे त्यांना इतर काही लक्षणे दिसत नव्हती. डोळ्यांची हालचाल करणारे स्नायू कमजोर झाल्यामुळे डोळ्यांमधील सहकार्य बिघडून एका ऐवजी दोन प्रतिमा दिसणे, अन्ननालीकेचे स्नायू दुबळे होवून गिळताना त्रास होणे, चालल्यानंतर पायांतली शक्ती कमी होणे, श्वासपटल दमल्यामुळे श्वासाला त्रास होणे इत्यादी गंभीर लक्षणे अजून दिसत नव्हती.
पेशंटची शारीरिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर, मी त्या दोघांशी बोलत होतो," हे पहा, अनंतराव, तुम्हाला एक आजार झालेला दिसतो आहे व त्याचे नाव आहे - स्नायू दौर्बल्य ! इंग्रजीमध्ये त्याला मायस्थेनिया ग्राव्हीस किंवा एम जी असे म्हणतात. अर्थात या आजाराचे नेमके व नक्की निदान होण्यासाठी आणखी काही चाचण्या करणे आवश्यक आहे. "
या विचित्र आजाराविषयीचे माझे वक्तव्य ऐकून गायकवाड पतीपत्नी अतिशय चिंतीत झाले होते. आपण एक चांगले निदान केल्याचा आनंद , गायकवाड कुटुंबीयांवर अचानक कोसळलेल्या या प्रसंगामुळे केव्हांच विरून गेला होता.
" डॉक्टर, आम्ही दोघेही या आजारामुळे अगदीच घाबरून गेलो आहोत. आम्हाला थोडी आणखी माहिती दिलीत तर फार बरे होईल."
